धुळे धक्कादायक: लग्नाच्या तीन दिवस आधी कासारेतील भावी नवरदेवाचा इलेक्ट्रिक शॉकने मृत्यू
धुळे | प्रतिनिधी: नागिंद मोरे
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कासारे गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. लग्नाच्या तयारीत असलेल्या भावी नवरदेवाचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
कासारे येथील आदिवासी समाजातील युवक धनु बाजीराव माळचे याचे 25 फेब्रुवारी रोजी लग्न ठरले होते. घरात आनंदाचे वातावरण असताना लग्नाची तयारी सुरू होती. मात्र घराची साफसफाई करत असताना धनु माळचे यांना अचानक विजेचा तीव्र धक्का बसला आणि ते खाली कोसळले.
त्यांना तात्काळ साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर लग्नघरात एकच आक्रोश पसरला आणि आनंदाचे वातावरण क्षणात शोकात बदलले.
धनु माळचे हा कुटुंबातील कष्टाळू आणि एकुलता एक मुलगा होता. क्रिकेट खेळाची विशेष आवड असलेला आणि गावातील तरुणांमध्ये मिळून मिसळून राहणारा धनु अचानक सर्वांना सोडून गेल्याने कासारे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आज सकाळी कासारे येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांचा अंत्यविधी पार पडला. अंत्यविधीवेळी अनेकांच्या डोळ्यातून अश्रूंना बांध फुटला होता. गावकऱ्यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.


