शेतकऱ्यांच्या आंदोलनास्थळी आढळली महादेवाची पिंड; खदान रद्द करून मंदिर उभारण्याची मागणी
धुळे, शिंदखेडा: शिंदखेडा तालुक्यातील मेथी गावात गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला आज वेगळेच वळण मिळाले आहे. अनधिकृत खदान रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान, आंदोलनस्थळीच एक महादेवाची जुनी पिंड आढळून आली आहे. यामुळे आता याच ठिकाणी महादेवाचे मंदिर उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
महिलांना मिळाली महादेवाची पिंड
आज मेथी गावातील काही महिला उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आल्या होत्या. खदानीचे काम नेमके कसे सुरू आहे, हे पाहण्यासाठी त्या घटनास्थळी गेल्या असता, त्यांना त्या खदानीमध्ये ही जुनी पिंड आढळून आली.
या घटनेमुळे उपोषणकर्त्यांसह मेथी परिसरातील सर्व नागरिकांनी या पिंडीची स्थापना त्याच जागेवर करून तिथेच महादेवाचे भव्य मंदिर उभारण्यात यावे, अशी मागणी केली आहे. या नव्या मागणीमुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता धार्मिक स्वरूप प्राप्त झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच शिवसेना उपजिल्हाप्रमुख शानभाऊ सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि आंदोलनाला पाठिंबा दिला. या घटनेमुळे आता खदान रद्द करण्याच्या मागणीला अधिक बळ मिळाले आहे.