शिरपूरात पोलीसांचा भव्य रूट मार्च; गणेशोत्सव व बकरी ईद शांततेत साजरी करण्याचे आवाहन
येणाऱ्या गणेशोत्सव व बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शिरपूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ व्हावी या उद्देशाने शिरपूर शहर पोलिसांच्या वतीने भव्य रूट मार्च काढण्यात आला. हा रूट मार्च उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी तसेच पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. शहरातील कुंभार टेक, मारवाडी गल्ली, पाच कंदील चौक, मुख्य बाजारपेठ आदी भागातून पोलीस दलाने शिस्तबद्ध पद्धतीने संचलन केले. यावेळी पोलीस दलाच्या टवटवीत उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले….
रूट मार्चदरम्यान पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधून “सण हा आनंदाचा असतो, गोंधळाचा नव्हे” असा संदेश दिला. तसेच अफवांना बळी न पडता कोणतीही शंका अथवा संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे व सणासुदीच्या काळात बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता पोलिस प्रशासनाने पूर्वतयारी म्हणून हा रूट मार्च काढला असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते….