शिरपूर तालुक्यात बिबट्याचा थरार : दोन तासाचा रेस्क्यू ऑपरेशन नंतर बिबट्या जर बंद
शिरपूर तालुक्यातील निमझरी रस्त्यावर पाठचारी शिवारात आज सकाळी सुमारास दहाच्या सुमारास बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याला अचानक बिबट्या दिसला आणि त्याने ही माहिती तातडीने इतर शेतकऱ्यांना दिली. काही वेळातच परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी याची माहिती तात्काळ शिरपूर शहरातील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होताच बिबट्याला सुरक्षितरित्या पकडण्यासाठी मोठे रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. तब्बल दोन तास चाललेल्या या मोहिमेत वनविभागाने बिबट्याला ट्रॅक्युलाइज गनच्या सहाय्याने बेशुद्ध करून यशस्वीपणे जेरबंद केले.
बिबट्याला तात्काळ प्राथमिक औषधोपचार करून वनविभागाच्या ताब्यात घेण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्याला धुळे येथे हलविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, शेतशिवारात बिबट्या दिसल्याने शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांनी वनविभागाने परिसरात अधिक दक्षता घ्यावी, अशी मागणी केली आहे.