साक्रीत तालुक्यात युरिया खताची टंचाई; संतप्त शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
धुळे, साक्री (प्रतिनिधी): साक्री तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या युरिया खताच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांचा संयम सुटला आहे. खत न मिळाल्याने संतप्त झालेल्या बोदगाव येथील दोन शेतकऱ्यांनी थेट दहिवेलच्या भर बाजारपेठेत अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित जागरूक शेतकऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी दुर्घटना टळली.
नेमके काय घडले ?
भारत सरकारच्या खते विभागाने फेब्रुवारी २०२५ मध्ये खत पुरवठा योजना जाहीर केली असली तरी, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात युरियाची कमतरता जाणवत आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. याच परिस्थितीला कंटाळून २८ ऑगस्ट २०२५ रोजी बोदगाव येथील शेतकरी लक्ष्मण सूर्यवंशी (वय ५४) आणि डोंगरू बहिरम (वय ३३) यांना दिवसभर भटकूनही युरिया खताची एकही बॅग मिळाली नाही.
यामुळे संतापलेल्या दोघांनी दहिवेलच्या बाजारपेठेत आपल्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ते आग लावण्याच्या तयारीत असतानाच, उपस्थित शेतकरी विजय अहिरे (सरपंच बोदगाव), आण्णाभाऊ चौरे, तुषार साबळे, विशाल ठाकरे, भैय्या सूर्यवंशी, दिनेश सूर्यवंशी, भगवान सूर्यवंशी यांनी धाव घेत त्यांना रोखले आणि त्यांची समजूत काढली.
सरकारी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये सुरू असलेली चर्चा अधिक तीव्र झाली आहे. सध्या राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचे सरकार असतानाही शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेले युरिया खत वेळेवर उपलब्ध होत नसल्याने सरकार आणि सरकारी यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेने सरकारी यंत्रणेने वेळीच जागे होऊन शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवाव्यात, जेणेकरून भविष्यात अशा घटना आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळता येतील, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
वृत्त प्रतिनिधी- धनंजय गाळणकर