दोंडाईचा पोलिसांची धडक कारवाई; अवैध विदेशी दारूसह दोघे जेरबंद, ६.५ लाखांचा मुद्देमाल जप्त
धुळे, दोंडाईचा: आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी धुळे पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. याचाच भाग म्हणून दोंडाईचा पोलिसांनी नंदुरबारकडे होणारी अवैधरीत्या विदेशी दारूची वाहतूक पकडून दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे सापळा
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार, दोंडाईचा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश सोनवणे यांना गुप्त माहिती मिळाली की, एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून (क्र. MH-39-J-2869) नंदुरबारकडे अवैध विदेशी दारूची वाहतूक होणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नंदुरबार चौफुली येथे अचानक नाकाबंदी केली.
संशयित कार दिसताच पोलिसांनी तिला थांबवून तपासणी केली असता, गाडीत अवैधरीत्या विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी लगेचच चालक करण कुंदन बजरंगे (वय २४) आणि त्याचा साथीदार शिवाजी धासू वळवी (वय ४२) यांना ताब्यात घेतले.
अंदाजे ६.५ लाखांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून विदेशी दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेली कार असा एकूण ६ लाख ५५ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही आरोपींवर दोंडाईचा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ) (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार रमेश वाघ करत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.