पावसाचा धुळ्यातील शेतकऱ्यांना फटका; टोमॅटोचे भाव घसरले, शेतकरी हवालदिल
धुळे: गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता शेती पिकांना बसू लागला आहे. यामुळे टोमॅटो आणि पालेभाज्यांचे भाव कमालीचे घसरले असून, शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
टोमॅटो उत्पादकांचे मोठे नुकसान
गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता जोरदार पुनरागमन केले आहे. या पावसामुळे टोमॅटोच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मागील आठवड्यात ९०० ते १००० रुपये प्रति कॅरेट दराने विकला जाणारा टोमॅटो आता थेट २०० ते २५० रुपयांवर आला आहे.
या अचानक झालेल्या भावाच्या घसरणीमुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्याचबरोबर पालेभाज्यांचे भावही मातीमोल झाल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
याविषयी बोलताना अडत दुकानदार हरीश माळी यांनी सांगितले की, “अचानक आलेल्या पावसामुळे बाजारात माल जास्त प्रमाणात येतो, पण तो खराब झालेला असतो. यामुळे दर खूप कमी मिळतो आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.”