नगावबारी परिसरात विहिरीत पडून तरुणीचा मृत्यू; घातपाताचा संशय, पोलीस तपास सुरू
धुळे: धुळे शहरालगत असलेल्या नगाव बारी परिसरातील महाकाली मंदिराच्या जवळ एका विहिरीत पडून एका २० वर्षीय विवाहित तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आत्महत्या आहे की घातपात, याबाबत नातेवाईकांकडून संशय व्यक्त केला जात आहे, तर दुसरीकडे मेंढपाळ समाजाने हा अपघात असल्याचे म्हटले आहे.
नेमके काय घडले?
दुर्गाबाई साहेबराव टिळे असे मृत तरुणीचे नाव असून, ती मेंढपाळ (ठेलारी) समाजाची आहे. परिसरातील एका नातेवाईकाला ती विहिरीत पडलेली दिसली. त्यांनी तातडीने इतरांना माहिती दिली. माहिती मिळताच, ठेलारी बांधवांनी आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल मराठे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तरुणीला विहिरीतून बाहेर काढले, परंतु पाण्यात बुडाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
दुर्गाबाई टिळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
तवाईकांकडून घातपाताचा संशय
या घटनेबाबत नातेवाईकांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे. हा केवळ अपघात नसून, त्यामागे काहीतरी घातपात असल्याचा संशय काही नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, ठेलारी मेंढपाळ बांधवांनी हा अपघात असल्याचे म्हटले असून, तिचा पाय घसरून ती विहिरीत पडली असावी, असे सांगितले.
या प्रकरणाची नोंद उशिरापर्यंत पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते. पोलीस पुढील तपास करत आहेत.