एआयचा गैरवापर करून मुख्यमंत्र्यांची बदनामी; आमदार अनुप अग्रवाल यांनी धुळ्यात गुन्हा दाखल केला
धुळे: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी धुळ्याचे भाजप आमदार अनूप अग्रवाल यांनी तातडीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे.
एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करून व्हिडिओ तयार
व्हिडिओ पहा
https://www.instagram.com/reel/DOBVgtqEVsq/?igsh=MXJxa3Ficm82M2pn
आमदार अनुप अग्रवाल हे त्यांच्या घरी असताना हा आक्षेपार्ह व्हिडिओ त्यांच्या लक्षात आला. इंस्टाग्रामवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नीचा फोटो वापरून एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने तो विकृत स्वरूपात तयार करण्यात आला होता. मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीची बदनामी करण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत आमदार अग्रवाल यांनी तात्काळ धुळे सायबर पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.