धुळे; गजानन महाराज मंदिरातून दानपेटी चोरणारे दोन सराईत चोरटे २४ तासांत जेरबंद
धुळे: शहरातील गजानन कॉलनी येथील श्री गजानन महाराज मंदिरातून दानपेटी चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना चाळीसगाव रोड पोलिसांनी अवघ्या सहा तासांत अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमालही हस्तगत केला आहे.
नेमके काय घडले ?
गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या अंधारात मंदिरातून दानपेट्या आणि दागिने चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना गजानन कॉलनीतील श्री गजानन महाराज मंदिरात घडली. दोघा चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून दानपेटी चोरून नेली होती. सकाळी ही बाब भाविकांच्या लक्षात आल्यावर एकच खळबळ उडाली.
तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर, पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अरिहंत मंगल कार्यालयाजवळ सापळा रचला. मोटरसायकलवरून पळून जाणाऱ्या आरोपींचा पाठलाग करून त्यांना पोलिसांनी शिताफीने पकडले.
चोरीची मोटरसायकलही जप्त
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे साहिल सत्तार शाह आणि सोहेल आरिफ शाह अशी आहेत. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून मंदिरातून चोरलेली दानपेटी आणि गुन्ह्यात वापरलेली एक चोरीची मोटरसायकल असा एकूण ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.