धुळे अवैध धंद्यांची राजधानी? शहरात ३६७ ठिकाणी गैरव्यवहार सुरू असल्याचा राष्ट्रवादीचा दावा
धुळे: धुळे शहर अवैध धंद्यांची राजधानी बनले असून, शहरात तब्बल ३६७ ठिकाणी बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने केला आहे. या अवैध धंद्यांतून दरमहा ७५ कोटी रुपयांची उलाढाल होत असून, प्रशासन कारवाई करण्याऐवजी राजकीय प्रतिनिधींप्रमाणे वागत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषदेत केला.
गैरव्यवहारांची यादीच सादर
आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन शहरातील वाढत्या अवैध धंद्यांवरून सत्ताधारी पक्ष आणि पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले. शहरात कोणत्या प्रकारचे बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत, याची सविस्तर यादीच त्यांनी यावेळी सादर केली.
“जोपर्यंत हे अवैध धंदे बंद होत नाहीत, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” असे रणजितराजे भोसले यांनी स्पष्ट केले. तसेच, शहरात तातडीने कठोर कारवाई करून हे सर्व अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.