धुळ्यात शेतात सोडलेल्या करंटने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
धुळे: धुळे तालुक्यातील पुरमेपाडा शिवारात शेताच्या तारेच्या कुंपणात सोडलेल्या विजेच्या प्रवाहामुळे एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी काही शेतकरी रात्रीच्या वेळी तारेच्या कुंपणामध्ये विद्युत प्रवाह सोडतात, मात्र हाच प्रवाह एका निष्पाप व्यक्तीच्या जीवावर बेतला आहे.
बकऱ्यांसाठी चारा आणायला गेला, अन्…l
ओंकार माळीच नावाचा शेतकरी आपल्या बकऱ्यांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेला होता. याच वेळी, शेतीत सोडलेल्या करंटच्या तारेला त्याचा स्पर्श झाला आणि जागेवरच त्याचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच धुळ्यातील चितोड येथेही अशाच प्रकारची घटना घडली होती.
संबंधित शेतकऱ्यावर गुन्हा दाखल होणार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतात अशा प्रकारे विजेचा प्रवाह सोडणे हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे. या घटनेबद्दल बोलताना पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी सांगितले की, “पुरमेपाडा येथील घटनेत संबंधित शेतमालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.”
या घटनेमुळे शेतात विजेचा वापर करण्याच्या धोक्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे आणि प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.