धुळ्यात एका तरुणावर प्राणघातक हल्ला; तरुणाची प्रकृती चिंताजनक
धुळे, प्रतिनिधी: गणेश विसर्जन मिरवणुकीच्या रात्री धुळे शहरातील एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. दोन गटांमधील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणाला गंभीर दुखापत झाली असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
नेमके काय घडले?
गणेश विसर्जन सुरू असताना, धुळे शहरातील गल्ली क्रमांक २, कांती कॉम्प्लेक्सच्या मागे दोन गटांमध्ये वाद सुरू होते. याच वेळी प्रमोद उर्फ सोनू चित्ते (रा. देवपूर, धुळे) हा तरुण त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करत होता. याच प्रयत्नात असताना एका तरुणाने धारदार शस्त्राने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला.
या हल्ल्यात प्रमोद चित्ते गंभीर जखमी झाला असून, त्याच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली.
प्रतिनिधी – नागिंद मोरे, धुळे