
Dhule News मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर रद्द करा; धुळ्यात समता परिषदेची मागणी


धुळे: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाला महात्मा फुले समता परिषद आणि समस्त ओबीसी समाजाने तीव्र विरोध दर्शवला आहे. राज्य शासनाने काढलेला आरक्षणाचा जीआर (शासन निर्णय) तात्काळ रद्द करावा, अशी मागणी धुळे शहर व तालुका शाखेने मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन केली आहे.
‘हा मूळ ओबीसींवर अन्याय‘
समता परिषदेचे महानगरप्रमुख उमेश महाजन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “मराठा समाजाला आरक्षण मिळावे यास आमचा पाठिंबा आहे, मात्र ते ओबीसी प्रवर्गातून देऊ नये,” असे त्यांनी सांगितले. ओबीसी प्रवर्गात आधीच साडेतीनशेहून अधिक जातींचा समावेश आहे, ज्यांना अद्यापही पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही. अशा परिस्थितीत मराठा समाजासारख्या मोठ्या वर्गाला ओबीसीत समाविष्ट केल्यास मूळ ओबीसींवर मोठा अन्याय होईल, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
जर सरकारने हा जीआर रद्द केला नाही, तर समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ यांच्या आदेशाने राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
प्रतिनिधी नागिंद मोरे



