
Dhule News धूळ खात पडलेल्या रस्त्यामुळे धुळेकर संतप्त; प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध


धुळे: शहरातील नेहरूनगर परिसरातील रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले असल्यामुळे स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक संतप्त झाले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून, याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने आज संतप्त नागरिकांनी महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून जोरदार निषेध व्यक्त केला.
अपघातांमुळे दोन जणांचा बळी
या रस्त्याचे काम मनपा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या समन्वयाने सुरू करण्यात आले होते. मात्र, रस्ता ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप होत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात आतापर्यंत दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे.
या सर्व प्रकाराला कंटाळून नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. महानगरपालिका आणि जीवन प्राधिकरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली आणि आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
प्रतिनिधी नागिंद मोरे



