
धुळे जिल्ह्यातील हरणमाळ गाव शासनदरबारी हरवले; ग्रामस्थ विकासावंचित


धुळे तालुक्यातील हरणमाळ हे गाव गेल्या सात वर्षांपासून शासनदरबारी हरवले असून ग्रामस्थ विकासकामांपासून वंचित आहेत. सन 2018 पर्यंत हरणमाळ हे मोराणे (प्र.ल.) ग्रामपंचायतीत समाविष्ट होते. परंतु धुळे शहर हद्दवाढीनंतर हा भाग विभक्त झाला. त्यानंतर आजतागायत हरणमाळ या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळालेली नाही.
गावात ना ग्रामसेवक, ना सरपंच, ना तलाठी अशी परिस्थिती आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. जन्म-मृत्यू दाखले, रहिवासी दाखला, 7/12 उतारा आदी मूलभूत कागदपत्रे उपलब्ध होत नाहीत. पिण्याचे शुद्ध पाणी, रस्ते, सार्वजनिक शौचालय, मुतारी, पाण्याची टाकी यांचा पूर्ण अभाव आहे. शिक्षणासाठी चौथीपर्यंत शाळा असून पुढील शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांना धुळे शहरात किंवा गावाबाहेर जावे लागते.
या समस्या मांडण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश ढालवाले यांच्यासह हारनमाळ ग्रामस्थांनी अनेकदा अधिकाऱ्यांची भेट घेऊन देखील दखल घेण्यात आली नाही. अधिकारी एकमेकांकडे जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गाव प्रशासनाच्या अभावामुळे हरणमाळचे नागरिक हतबल झाले आहेत. समस्या सोडवण्यात शासनाने गंभीरता दाखवली नाही तर आत्मदहना सारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला…
प्रतिनिधी नागिंद मोरे



