
धुळे बाजारपेठेत व्यापाऱ्याच्या दुचाकीवरील लाखो रुपयांची बॅग लंपास


धुळे: धुळे शहरातील ग. नं. ४ परिसरातील बाजारपेठेत एका व्यापाऱ्याच्या दुचाकीवर ठेवलेली लाखो रुपयांची पिशवी अज्ञात चोरट्यांनी क्षणात चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पापणी लवण्याच्या आत झालेल्या या चोरीमुळे शहरातील व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नेमके काय घडले?
धुळ्यातील ‘धुलीया ट्रेडर्स’चे मालक गोकुळ गंगाधर बधान हे काल रात्री ९ वाजता आपले दुकान बंद करत होते. याच वेळी त्यांची दुचाकी दुकानाबाहेर उभी होती आणि त्यावर लाखो रुपये असलेली एक पिशवी ठेवलेली होती. अज्ञात चोरट्याने क्षणाचाही विलंब न लावता ही पिशवी चोरून दुचाकीवरून पळ काढला.
व्यापाऱ्याला चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करून आजूबाजूच्या लोकांना जमा केले, मात्र तोपर्यंत चोरटा पसार झाला होता.
व्यापाऱ्यांची सुरक्षा ऐरणीवर
या घटनेमुळे बाजारपेठेतील व्यापारी भयभीत झाले आहेत. असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्स या व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष कोटेचा यांनी चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि व्यापाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करावी, अशी मागणी केली आहे.



