
धुळे हादरले: खेळवण्याच्या बहाण्याने घरात नेले, ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; संतप्त ग्रामस्थांकडून फाशीची मागणी.


धुळे, सोनगीर: ऐन नवरात्रीत स्त्री शक्तीचा जागर होत असतानाच, धुळे तालुक्यातील सोनगीर गावात माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. येथे एका नराधम चुलत काकाने अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केला आहे. या घृणास्पद कृत्याने सोनगीरसह संपूर्ण धुळे जिल्हा हादरला आहे.
नराधमाने घरात नेऊन केला अतिप्रसंग
पीडित बालिकेच्या आईने सोनगीर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, काल सायंकाळी मुलीचा चुलत काका मयुर बापू माळी (रा. सोनगीर) हा तिला खेळवण्याच्या बहाण्याने आपल्या घरी घेऊन गेला. रात्री ९ च्या सुमारास मुलगी रडू लागली आणि तिने गुप्तांग दुखत असल्याचे सांगितले. अधिक चौकशी केल्यावर तिने घडलेला हृदयद्रावक प्रकार सांगितला. नराधम काकाने तिला घरात नेऊन आतून कडी लावली आणि तिच्यावर अतिप्रसंग केला.
हा प्रकार कळताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली आणि मुलीच्या आईने तातडीने सोनगीर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.
आरोपीला तात्काळ बेड्या, फाशीची मागणी
या घटनेचे गांभीर्य ओळखून सोनगीर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नराधम आरोपी मयुर बापू माळी याला रात्रीच ताब्यात घेतले. त्याच्यावर लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घृणास्पद कृत्यामुळे सोनगीर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. संतप्त नातलग आणि ग्रामस्थांनी या नराधमाला फासावर लटकवण्याची मागणी केली आहे.
प्रतिनिधी नागिंद मोरे



