
Dhule News शेतातील पिकांचे नुकसान करणाऱ्या डुक्करांचा बंदोबस्त करा; शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी


धुळे: धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील महामार्गालगत असलेल्या शेतांमध्ये पाळीव डुक्करांनी थैमान घातले असून, यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांनी आता तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पाच वर्षांपासून पिकांचे मोठे नुकसान
धुळे तालुक्यातील गरताड येथील शेतकरी सुधाकर पांडुरंग पाटील यांच्या मालकीच्या शेतात गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पाळीव डुक्करांनी मोठा उपद्रव सुरू केला आहे. त्यांच्या बाजरी, मका आणि भुईमूग या पिकांचे डुक्कर मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत.
शेतकरी विजय पाटील यांनी सांगितले की, तोंडाशी आलेला घास डुकरांनी हिरावून घेतला आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे (पाऊस) शेतीचे नुकसान होत असताना, दुसरीकडे पाळीव डुक्करांमुळे उरलेले पीकही नष्ट होत आहे.
प्रशासनाकडून दुर्लक्ष
शेतकऱ्यांनी डुक्करांच्या मालकांना वारंवार विनंती करूनही त्यांनी याकडे लक्ष दिलेले नाही. तसेच, प्रशासनाकडे तक्रार देऊनही कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.
शेतकरी सुधाकर पांडुरंग पाटील यांनी मागणी केली आहे की, प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घ्यावी आणि तात्काळ डुक्करांच्या मालकांवर कारवाई करून डुक्करांना गावाबाहेर काढावे. अन्यथा, उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.



