
Dhule News अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली पाहणी, तात्काळ मदतीची मागणी


धुळे; राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक संकट ओढवले आहे. उत्तर महाराष्ट्र विभागात विशेषतः धुळे जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना तात्काळ प्रति हेक्टर 50 हजार रुपयांची मदत द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
उत्तर महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने समित्या गठित करण्यात आल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार या समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांना या पाहणी समितीचे प्रमुख नेमण्यात आले आहे…
खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांनी धुळे तालुक्यातील नाणे, सिताणे, नंदाळे, बोरकुंड व शिरूड शिवारातील शेतांमध्ये जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी श्री. रोहन कुवर देखील उपस्थित होते. यावेळी पंचनामे पूर्ण झाले आहे की नाही याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पाहणी अहवाल काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाकडे सादर करण्यात येणार असून त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.



