
थाळनेर पोलिसांची धडक कारवाई! अनेर डॅम परिसरात ५४ लाखांचा गांजा केला नष्ट


धुळे, थाळनेर: थाळनेर पोलीस स्टेशनच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे अनेर डॅम परिसरातील वनजमिनीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ५४ लाख ३६ हजार रुपये किमतीचा गांजा नष्ट केला असून, हा धुळे जिल्ह्यातील गांजा लागवडीवरील सर्वात मोठ्या कारवाईपैकी एक आहे.
३ एकर वनजमिनीत गांजाची लागवड
थाळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी शत्रुघ्न पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी राजपत्रित अधिकारी पो.नि. जयपाल हिरे, शासकीय पंच आणि फॉरेन्सिक पथकासह अनेर डॅम लगत असलेल्या वनजमिनीत छापेमारी केली.
या छाप्यात सुमारे ३ एकर वनजमिनीत मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड आढळून आली. पोलिसांनी घटनास्थळावरून २७१८ किलो वजनाचे गांजाचे झाडे पंचासमक्ष जप्त करून नष्ट केले. त्याची अंदाजित किंमत ५४ लाख ३६ हजार रुपये आहे.
सदर जमीन महेंद्र दला पावरा (रा. बिस्टान, जि. खरगोन, म.प्र.) यांच्या नावावर असून, यातील मुख्य आरोपी फरार आहे. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक हर्षल पाटील तपास करत आहेत. थाळनेर पोलिसांच्या या धाडसी कामगिरीबद्दल परिसरात कौतुक होत आहे.



