राष्ट्रध्वज उलटा फडकवल्याने ग्रामस्थ संतप्त; साक्री तालुक्यातील दिघावे ग्रामपंचायतीला ठोकले टाळे
धुळे, साक्री: स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच ध्वजारोहणासारख्या पवित्र कार्यक्रमात साक्री तालुक्यातील दिघावे गावात एक मोठी चूक घडली. दिघावे ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य आणि ग्रामसेवकांच्या निष्काळजीपणामुळे राष्ट्रध्वज उलटा फडकवण्यात आला. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायतीला टाळे ठोकून आपला निषेध व्यक्त केला.
ग्रामस्थ आक्रमक, पोलिसांना पाचारण
या घटनेमुळे दिघावे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतापलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून साक्री पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतानाच, ग्रामस्थांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या निष्काळजीपणाबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली. यावेळी ग्रामस्थ आणि सरपंच यांच्यात जोरदार शाब्दिक वादही झाला.
या घटनेमुळे एका बाजूला स्वातंत्र्य दिनाचा उत्साह असताना, दुसरीकडे ग्रामपंचायत प्रशासनाच्या चुकीमुळे राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. या गंभीर घटनेमुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.