
शिरपूरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा! अतिवृष्टीग्रस्त यादीत तात्काळ समावेशाची मागणी


शिरपूर (धुळे) | प्रतिनिधी: नागिंद मोरे
धुळे जिल्ह्याचा अतिवृष्टीग्रस्त जिल्हा म्हणून राज्य शासनाने जाहीर केलेल्या यादीत शिरपूर तालुक्याचा समावेश न झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या निषेधार्थ आज शिरपूर फर्स्ट व शिरपूर तालुक्यातील शेतकरी संघटनांच्या पुढाकाराने शहरात एल्गार मोर्चा काढण्यात आला. करवंद नाका येथून सुरू झालेला हा मोर्चा शिरपूर तहसील कार्यालयावर संपन्न झाला.
मोर्चामध्ये तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. हातात फलक, बॅनर आणि नारेबाजी करत त्यांनी राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. “शिरपूरचा अतिदृष्टी समावेश करा”, “शेतकऱ्यांना न्याय द्या”, “आमचे हक्क आम्हाला द्या” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, मागील काही दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. कापूस, सोयाबीन, मका, उडीद या पिकांवर अतिवृष्टीचा गंभीर परिणाम झाला आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यांच्या कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. “जर पुढील आठवडाभरात शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर शेतकऱ्यांचा होणारा उद्रेक प्रशासनाला झेपणार नाही,” असा इशारा या मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला.



