धुळे जिल्ह्यात ५.७७ कोटींचा गांजा जप्त; २ हजार ३१० किलो अंमली पदार्थ हस्तगत
वनजमिनीवर ८ ते १० एकरांत गांजाची लागवड; स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस आणि वन विभागाची संयुक्त कारवाई
धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी यांनी अंमली पदार्थांची लागवड, साठवणूक आणि तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे १७ ऑक्टोबर रोजी फत्तेपूर, मांडणीपाडा व वाकपाडा शिवारातील अतिदुर्गम वनक्षेत्रात संयुक्त पथकाने छापा टाकला.
या कारवाईत शासकीय पंच, राजपत्रित अधिकारी, वजनकाटा पथक, छायाचित्रकार, शिरपूर तालुका पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
कारवाईदरम्यान पंडीत सरदार पावरा याच्या ताब्यातील वनजमिनीवरून १ हजार ४५० किलो गांजा (किंमत ३ कोटी ६२ लाख ५० हजार रुपये), अज्ञात व्यक्तीच्या ताब्यातील जागेवरून ३०० किलो गांजा (किंमत ७५ लाख रुपये), मोयला रेशम्या पावरा याच्या ताब्यातील जमिनीवरून ३६० किलो ८६० ग्रॅम गांजा (किंमत ९० लाख २१ हजार ५०० रुपये) आणि बन्सीलाल रसूल पावरा याच्या ताब्यातील जागेवरून २०० किलो गांजा (किंमत ५० लाख रुपये) जप्त करण्यात आला.
या कारवाईत एकूण २ हजार ३१० किलो ८६० ग्रॅम ओला व सुका कॅनाबीस (गांजा), ज्याची किंमत ५ कोटी ७७ लाख ७१ हजार ५०० रुपये आहे, हस्तगत करण्यात आला.
तपासादरम्यान वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करून सुमारे ८ ते १० एकर क्षेत्रात गांजाची लागवड करण्यात आल्याचे उघड झाले. अंमली पदार्थांची अवैध लागवड आणि तस्करीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


