धुळेतील प्रसिद्ध राम भरोसे रेस्टॉरंटला भीषण आग! सुदैवाने जीवितहानी टळली, मोठे आर्थिक नुकसान
धुळे शहरातील आग्रा रोडवरील प्रसिद्ध राम भरोसे रेस्टॉरंटला आज सायंकाळच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. रविवारी सायंकाळ असल्याने हॉटेलमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होती. दरम्यान, स्वयंपाकघरातून अचानक धुराचे लोट दिसू लागले आणि काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले.
ही घटना लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी व ग्राहकांनी तत्काळ बाहेर पळ काढल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीमुळे रेस्टॉरंटमधील साहित्य, फर्निचर आणि उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली असून, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. प्राथमिक अंदाजानुसार गॅस सिलिंडर लिकेज किंवा इलेक्ट्रिकल शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रतिनिधी नागिंद मोरे, धुळे


