Dhule News : धुळे पोलिसांची मोठी कामगिरी – सात घरफोड्यांचा आरोपी अखेर पकडला!
दिल्ली आणि अहमदनगर येथे घरफोड्या करणारा अटळ गुन्हेगार अखेर धुळे पोलिसांच्या हाती लागला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे झाशी राणी पुतळ्याजवळ संशयितास अटक केली. पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास घेतला असता, त्याची ओळख सोपान सोमनाथ पाटील (वय २९, रा. वणी, ता. धुळे) अशी पटली.
प्राथमिक चौकशीत त्याने दिल्ली आणि अहमदनगर येथे घरफोड्यांची कबुली दिली. मिळालेल्या माहितीनुसार, ६ जुलै रोजी अहमदनगरच्या भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात सोपान हा फरार होता.
सदर आरोपीविरुद्ध दिल्ली व अहमदनगरमधील विविध पोलिस ठाण्यांमध्ये एकूण सात गुन्हे दाखल असून त्यात तोफखाना, भिंगार कॅम्प, धुळे तालुका तसेच दिल्लीतील मयूर विहार आणि वसंत कुंज परिसरातील घरफोड्यांचा समावेश आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने त्याला पकडून भिंगार कॅम्प पोलिस ठाणे, अहमदनगर यांच्या ताब्यात दिले.
या कारवाईत पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक अमित माळी, अमरजित मोरे, पोलिस अंमलदार मोछंद्र पाटील, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण आणि प्रल्हाद वाघ यांनी सहभाग घेतला.
ही संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलिस अधीक्षक अनंत देवेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.


