धुळे: शाळेतील मुख्याध्यापक आणि उपशिक्षक १५ हजारांची लाच घेताना रंगेहात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
धुळे जिल्ह्यात शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वेतनवाढ सुरू करणे आणि वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मुख्याध्यापक आणि उपशिक्षकाला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई (दि. ११) मांजरोद (ता. शिरपूर) येथे करण्यात आली.
जनता शिक्षण प्रसारक संस्था, बेटावद (ता. शिंदखेडा) संचलित महात्मा गांधी विद्यालय, मांजरोद येथील मुख्याध्यापक कैलास सखाराम पाटील (वय ५६) आणि उपशिक्षक गोपाल रघुनाथ पाटील (वय ४७) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे त्याच संस्थेच्या शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची वार्षिक वेतनवाढ जुलै २०२३ पासून स्थगित करण्यात आली होती तसेच १२ वर्षांची सेवा पूर्ण होऊनही वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली नव्हती.
या संदर्भात तक्रारदाराने मुख्याध्यापक कैलास पाटील यांना भेटून विनंती केली असता, त्यांनी उपशिक्षक गोपाल पाटील यांच्याकडे १५ हजार रुपये द्यावेत, अन्यथा काम होणार नसल्याचे सांगितले. तक्रारदाराने तत्काळ धुळे एसीबी कार्यालयात तक्रार नोंदवली.
त्यानंतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक पडताळणी केली असता, मुख्याध्यापकांकडून लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर साक्री परिसरात सापळा रचण्यात आला आणि उपशिक्षक गोपाल पाटील यांनी तक्रारदाराकडून १५ हजार रुपये घेताच एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.
या प्रकरणात मुख्याध्यापक आणि उपशिक्षक दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईचे पर्यवेक्षण उपअधीक्षक सचिन साळुंखे यांनी केले. सापळा अधिकारी यशवंत बोरसे यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस कर्मचारी जगदीश बडगुजर, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, पद्मावती कलाल, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रविण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के आणि सुधीर मोरे यांनी सहभाग घेतला.
या कारवाईला नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनिल दोरगे यांचे मार्गदर्शन लाभले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय, निमशासकीय किंवा खासगी कार्यालयात कोणीही लाच मागितल्यास त्वरित तक्रार नोंदवावी. विभागाचा टोलफ्री क्रमांक १०६४, दूरध्वनी ०२५६२–२३४०२० किंवा ईमेल dyspacbdhule@gmail.com तसेच संकेतस्थळ acbmaharashtra.gov.in या माध्यमांतून संपर्क साधता येईल.


