धुळ्यात मुस्लिम महिलांतर्फे यज्ञाला श्रद्धांजली; घटनेचा निषेध, आरोपीस फाशीची मागणी तीव्र
धुळे
प्रतिनिधी : नागिंद मोरे
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चिमुरडी यज्ञावर झालेल्या अमानवी अत्याचार आणि हत्येच्या घटनेचा धुळे शहरात प्रचंड संताप आणि तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेने सर्व समाजमन हादरले असताना, धुळ्यातील मुस्लिम महिलांनीही पुढाकार घेत शांततेत पण ठामपणे न्यायाची मागणी केली आहे.
अलहेरा स्कूलच्या मागे, बोरसे कॉलनीजवळील अल्मरियम महिला अनाथ आश्रमात मुस्लिम समाजातील महिलांनी यज्ञाला श्रद्धांजली अर्पण करून हृदयस्पर्शी श्रद्धांजली वाहिली. या वेळी महिलांनी “यज्ञाला न्याय मिळालाच पाहिजे” असा निर्धार व्यक्त केला.
फास्टट्रॅक न्यायालयातून जलद सुनावणीची मागणी
महिलांनी प्रशासनाला निवेदन देत आरोपीला फास्टट्रॅक न्यायालयामार्फत तातडीच्या सुनावणीद्वारे फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. अशा क्रूर घटनांना आळा बसावा यासाठी कठोर संदेश देणे अत्यावश्यक असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले.
मोबाईलचा वाढता गैरवापर ही चिंताजनक बाब — नाजनीन शेख
शांततापूर्ण निषेधावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या नाजनीन शेख म्हणाल्या की,
“मोबाईल फोनच्या वाढत्या गैरवापरामुळं समाजात विकृत मानसिकता वाढत आहे. निरपराध मुलांवर विपरीत संस्कार होत असून अशा घटनांना आळा बसण्यासाठी कठोर शिक्षा, जागरूकता आणि योग्य संस्कार गरजेचे आहेत.”
महिलांची मोठी उपस्थिती
या कार्यक्रमात नाजनीन शेख, अल्कमा अन्सारी, हमिदा शेख, शबाना शेख, अमिना अन्सारी, अत्तरुनिसा साजिद लतीफ, असेफा अन्सारी यांसह मुस्लिम समाजातील अनेक महिला उपस्थित होत्या. महिलांनी सामूहिकरीत्या शांततेत निषेध नोंदवला आणि यज्ञाला न्याय मिळण्यासाठी ठोस व तातडीच्या कारवाईची मागणी केली.


