धुळे: कर्णकर्कशक बुलेट सायलेन्सरवर पोलिसांचा ‘रोड रोलर’; 65 सायलेन्सर नष्ट
धुळे शहरात कर्णकर्कशक आवाज करणाऱ्या बुलेटच्या फटाका सायलेन्सरवर अखेर पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. नियमबाह्य मॉडिफिकेशनवर बंदी असतानाही अनेक युवकांकडून हे सायलेन्सर बसवले जात असल्याचे तपासात आढळल्याने वाहतूक शाखेने बडगा उगारला.
संतोषी माता चौकात आज मोठी कारवाई करत पोलिसांनी जप्त केलेले एकूण 65 फटाका सायलेन्सर रोड रोलरखाली घालून नष्ट केले. कारवाई पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
अनेक बुलेटधारकांकडून कर्णकर्कशक आवाज करणारे हे सायलेन्सर काढून घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. यापुढेही नियमबाह्य सायलेन्सर, फॅन्सी नंबर प्लेट किंवा वाहनात अनधिकृत बदल आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला.
प्रतिनिधी नागिंद मोरे


