धुळे हादरले: मोहाडी उपनगरात 70 वर्षीय वृद्ध महिलेची घरातच निर्घुण हत्या; चोरीचाही संशय
धुळे | प्रतिनिधी: नागिंद मोरे
धुळे शहरातील मोहाडी उपनगरातून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. वाल्मीक वसाहतीत राहणाऱ्या लीलाबाई हिरामण सूर्यवंशी (वय 70) यांची त्यांच्या घरातच निर्घुण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हत्येनंतर घरातील साहित्य चोरीला गेल्याचेही उघड झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लीलाबाई सूर्यवंशी या अत्यंत हलाखीचे जीवन जगत होत्या. परिसरात भीक मागून त्या आपली उपजीविका करत होत्या. काही वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाने आत्महत्या केल्याने त्या घरात एकट्याच राहत होत्या. याच परिस्थितीचा फायदा घेत अज्ञात आरोपींनी त्यांच्या घरात प्रवेश करून तोंड दाबून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
हत्या केल्यानंतर आरोपींनी घरातील गॅस सिलिंडर तसेच इतर किरकोळ वस्तूंची चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून, त्यामुळे हा प्रकार चोरीच्या उद्देशातून करण्यात आल्याचा संशय बळावला आहे.
घटनेची माहिती मिळताच धुळे जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपींचा शोध घेण्यासाठी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथक पाचारण करण्यात आले असून, पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली कसून तपास सुरू आहे.
या अमानुष घटनेमुळे मोहाडी उपनगरासह संपूर्ण धुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून, एकाकी वृद्धांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
धुळे ब्रेकिंग न्यूज, Dhule Crime News, वृद्ध महिलेची हत्या, Mohadi Dhule Murder, Dhule Police News, Maharashtra Crime, Breaking News Dhule


