धुळे: जबरी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह केले जेरबंद
धुळे | प्रतिनिधी
दोंडाईचा–शिंदखेडा परिसरात जबरी चोरी करणाऱ्या एका अट्टल चोरट्यास धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करत त्याच्याकडून सुमारे 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.
दि. 01 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास, फिर्यादी जितेंद्र साहेबराव पवार (रा. महादेवपुरा, दोंडाईचा, ता. शिंदखेडा) हे जी.टी.पी. स्टॉप येथे एस.टी. बसची वाट पाहत उभे असताना, अज्ञात चोरट्याने अंधाराचा फायदा घेत त्यांच्या हातातील मोबाईल फोन, पाकीट व रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून पलायन केले होते.
या प्रकरणी देवपूर पोलीस ठाणे येथे दि. 13/12/2025 रोजी गुन्हा रजि. नं. 293/2025, BNS कलम 309(4) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला. घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्यात आले. तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयित अजय ऊर्फ गणेश आसाराम कोळी (वय 21, रा. देगांव, ता. शिंदखेडा) यास ताब्यात घेण्यात आले.
सखोल चौकशीत आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून चोरी केलेला मोबाईल व रोख रक्कम असा एकूण सुमारे 50,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे देवपूर पोलीस ठाणे हद्दीतील गु.र.नं. 293/2025 हा जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून, आरोपीविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर येत आहे. पुढील तपास सुरू आहे.


