शिरपूरात जळालेल्या कारमध्ये मानवी कवटी; रहस्यमय घटनेने परिसरात खळबळ
शिरपूर, धुळे : शिरपूर तालुक्यातील टेकवाडा–खामखेडा रस्त्यावर आज पहाटे घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. रस्त्याच्या कडेला उभी असलेली एक कार पूर्णतः जळून खाक झालेली आढळून आली असून, या जळालेल्या वाहनात मानवी हाडे व कवटी सापडल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.
ही कार मारुती सुझुकी (क्रमांक GJ-06-JO-6325) असून ती चंद्रकांत प्रताप धनगर (वय 43, रा. खामखेडा, ह.मु. सुरत) यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले आहे. जळालेल्या वाहनात आढळलेली मानवी कवटी व हाडे ही चंद्रकांत धनगर यांचीच असावीत, असा संशय व्यक्त केला जात आहे.
ही घटना टेकवाडा–खामखेडा रस्त्यावर बन्सीलाल दगडू पाटील यांच्या शेताजवळ घडली. पहाटे गहूच्या शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना अचानक मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले असता रस्त्यावर उभी असलेली कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली दिसली. काही वेळातच आगीने उग्ररूप धारण केल्याने जवळ जाणे अशक्य झाले. यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान जळालेल्या वाहनात मानवी हाडे व कवटी आढळून आल्याने हा अपघात की घातपात, याबाबत विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबची टीम दाखल झाली असून नमुने गोळा करण्यात आले आहेत. तसेच वाहनातील आग कशी लागली, स्फोट कशामुळे झाला, याचा तपास करण्यासाठी परिवहन विभागाचे अधिकारी देखील घटनास्थळी उपस्थित होते.
दरम्यान, चंद्रकांत धनगर हे काही वर्षांपासून सुरत येथे वास्तव्यास होते. घटनेच्या आदल्या दिवशी त्यांनी आपल्या भावाला तीन ते चार वेळा फोन करून “मी घरी येतोय” असे सांगितल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. त्यामुळे मृत्यू अपघाती नसून घातपाताचा असण्याची शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली असून सखोल चौकशीची मागणी केली जात आहे.
या प्रकरणी चंद्रकांत धनगर यांचे मोठे भाऊ किशोर प्रताप धनगर यांच्या तक्रारीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून पुढील तपास शिरपूर शहर पोलीस करीत आहेत


