धुळे : इन्स्टाग्राम स्टेटसवर ‘गुड बाय’; तापी नदीत उडी घेऊन २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या
प्रतिनिधी नागिंद मोरे| धुळे
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शिरपूर तालुक्यातील वाडी खुर्द येथील उमेश राजेंद्र पाटील (वय २२) या तरुणाने तापी नदीवरील पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली.
उमेश पाटील हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. तो रोजगारानिमित्त सुरत येथील एका खासगी कंपनीत काम करत होता. यात्रेनिमित्त दोन दिवसांपूर्वीच तो आपल्या मूळ गावी वाडी खुर्द येथे आला होता.
आत्महत्येपूर्वी उमेशने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तापी नदीच्या पार्श्वभूमीवर स्वतःचा सेल्फी शेअर करत त्यावर ‘गुड बाय’ असे स्टेटस ठेवल्याचे समोर आले आहे. त्यानंतर काही वेळातच त्याने तापी नदीत उडी घेतल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून गावात शोककळा पसरली आहे. उमेशने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.


