साक्री–पिंपळनेर परिसरात शेतमाल चोरी करणारी टोळी जेरबंद; 9.85 लाखांचा मुद्देमाल जप्त
साक्री | धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे
साक्री आणि पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्यांच्या शेतातून कापूस, सोयाबीन व बाजरी चोरी करणाऱ्या अट्टल टोळीचा पर्दाफाश करण्यात धुळे स्थानिक गुन्हे शाखा आणि साक्री पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या संयुक्त कारवाईत 5 आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून पिकअप वाहनासह एकूण 9 लाख 85 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून साक्री तालुक्यात शेतमाल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि साक्री पोलिसांना सदर गुन्हे उघडकीस आणण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
मुख्य आरोपी सिन्नर येथून अटकेत
तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सोन्या उर्फ सोनू निवा भिल (रा. किरवाडे, ता. साक्री, सध्या रा. सिन्नर, जि. नाशिक) हा सिन्नर येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस पथकाने सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह शेतमाल चोरी केल्याची कबुली दिली.
चार साथीदार पिंपळनेर येथे अटकेत
मुख्य आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी
विनोद गुलाब अहिरे (रा. मुल्हेर), सागर अनिल मालचे, लक्ष्मण माणिक मालचे आणि राज संभाजी मालचे (सर्व रा. धाडणे, ता. साक्री)
या चार आरोपींना पिंपळनेर येथील चौफुली परिसरातून ताब्यात घेतले.
पिकअप वाहनाचा वापर करून शेतमाल चोरी
आरोपींनी संगनमत करून पिकअप वाहनाचा वापर करत साक्री तालुक्यातील मालपूर, विजापूर, नांदवण, काबदे, बल्हाणे, विरदेल व घनेर या शिवारांतील शेतकऱ्यांच्या शेतातून कापूस, सोयाबीन व बाजरीची चोरी केल्याचे कबूल केले आहे.
7 गुन्ह्यांची उकल
या कारवाईमुळे साक्री पोलीस ठाण्यातील 4 आणि पिंपळनेर पोलीस ठाण्यातील 3 असे एकूण 7 गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास सुरू असून, आरोपींचा अन्य चोरीच्या घटनांशी संबंध आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
या यशस्वी कारवाईमुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.


