धुळे महानगरपालिका निवडणूक : अजित पवार गटाची राष्ट्रवादी स्वबळावर; महायुतीत फूट स्पष्ट
धुळे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी ही निवडणूक एकत्रितपणे लढवणार असल्याचे स्पष्ट झाले असताना, दुसरीकडे महायुतीत मात्र अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी धुळे महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याची अधिकृत घोषणा केली आहे. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या निवडणूक सुकाणू समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. फारुक शहा यांनी दिली.
डॉ. फारुक शहा यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे आतापर्यंत 74 जागांसाठी तब्बल 220 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. इच्छुक उमेदवारांची छाननी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे धुळे शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता असून, महायुतीत फूट स्पष्ट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. आगामी निवडणुकीत ही लढत अधिक रंगतदार होणार असल्याचे संकेत राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहेत.
प्रतिनिधी नागिंद मोरे


