धुळे; पिंपळनेरमध्ये छेडछाड करणाऱ्या तीन रोडरोमिओंना नागरिकांनी दिला चोप, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पिंपळनेर शहरात मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंचा उपद्रव वाढत असताना पिंपळनेर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बसस्थानक परिसरात छेडछाड करणाऱ्या तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे या तिघांपैकी दोन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली असून, या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
बसस्थानक परिसरात मुलींना त्रास देण्यात येत असल्याच्या तक्रारी सातत्याने मिळत होत्या. काही दिवसांपूर्वी एका शाळकरी मुलीची छेड काढणारा आरोपी अद्याप फरार असतानाच पुन्हा अशीच घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दामिनी पथकाच्या गस्तीचा प्रभाव कमी झाल्याची चर्चा देखील शहरात सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी सापळा रचून तिघा आरोपींना रंगेहाथ पकडले. संतप्त नागरिकांनी पकडलेल्या रोडरोमिओंना चोप दिल्याची माहिती असून, ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, पीएसआय विजय चौरे व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत.
पिंपळनेर, धुळे | प्रतिनिधी: नागिंद मोरे


