धुळ्यात भाजपाचा आणखी एक बिनविरोध विजय; प्रभाग 17 मधून सुरेखा उगले विजयी
धुळे | प्रतिनिधी
धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची घोडदौड सुरूच असून आज आणखी एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. प्रभाग क्रमांक 17 मधून भाजपाच्या सुरेखा उगले यांची बिनविरोध निवड झाली आहे. माघार घेण्याच्या पहिल्याच दिवशी हा विजय मिळाल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.
काल भाजपाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने पक्षाने विजयाचे खाते उघडले होते. आज सुरेखा उगले यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजपाचे आतापर्यंत तीन उमेदवार निवडणुकीपूर्वीच विजयी झाले आहेत.
या घडामोडीमुळे धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपाची ताकद अधिक वाढल्याचे चित्र असून, पुढील काही वेळात आणखी काही नगरसेवक बिनविरोध निवडून येण्याची शक्यता असल्याचा विश्वास भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. माघारीनंतर राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून इतर पक्षांच्या गोटातही हालचालींना वेग आला आहे.


