Dhule News धुळ्यात भाजपची विजयाची घोडदौड; प्रभाग १७ मधून अमोल मासुळे बिनविरोध, ४ जागा खिशात!
धुळे | प्रतिनिधी
धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने निवडणूकपूर्वीच आघाडी घेतली असून आतापर्यंत पक्षाचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उमेदवारी अर्ज माघारीच्या प्रक्रियेत सातत्याने माघारी होत असल्याने भाजपाच्या विजयाची घोडदौड सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे.
काल तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर, आज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक १७ मधून अमोल मासुळे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपाने निवडणुकीपूर्वीच चार नगरसेवकांची संख्या निश्चित केली असून यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
उमेदवारी अर्ज माघारीसाठी आजचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये धाकधूक वाढली आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीची प्रक्रिया सुरू राहणार असून त्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, भाजपाच्या विरोधात उमेदवारी दाखल केलेल्या अनेक उमेदवारांनी स्वतः संपर्क साधून माघार घेतली आहे. त्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत आणखी उमेदवार बिनविरोध निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
धुळे महापालिका निवडणुकीत पुढील काही तासांत कोणते राजकीय चित्र स्पष्ट होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


