धुळे; प्रभाग 4 मध्ये हजारो मतदान कार्डांचा साठा सापडल्याने खळबळ; एमआयएमचा राष्ट्रवादीवर आरोप
धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये हजारो मतदान कार्ड बेवारस अवस्थेत आढळल्याचा दावा करण्यात आला असून, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा प्रकार एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला असून, याबाबत त्यांनी प्रशासनाकडे तक्रार नोंदवली आहे.
एमआयएमच्या कार्यकर्त्यांना एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदान कार्डांचा साठा आढळून आला. ही बाब समोर येताच एमआयएमने या प्रकरणावर संशय व्यक्त करत निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. या मतदान कार्डांचा नेमका स्रोत काय आहे आणि ते तिथे कसे आले, याची सखोल चौकशी करण्याची मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
या प्रकरणाची माहिती एमआयएमचे नेते इर्शाद जहागीरदार यांनी धुळे महानगरपालिका आयुक्तांना दिली असून, दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. लोकशाही प्रक्रियेवर परिणाम होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने चौकशी करावी, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, प्रशासनाच्या वतीने या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून, मतदान कार्डांबाबत वस्तुस्थिती तपासून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
धुळे | प्रतिनिधी: नागिंद मोरे


