Dhule Crime धुळ्यात लाचखोर अधिकाऱ्यांची साखळीच ‘एसीबी’च्या तावडीत! ३० हजारांच्या लाचेने संपवलं करिअर…
धुळे जिल्ह्यात एकाचवेळी नगररचना विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील तिघे अधिकारी–कर्मचारी लाच प्रकरणात अडकल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. औद्योगिक प्रयोजनासाठी जमीन बिनशेती मंजूर करून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) तिघांना रंगेहाथ अटक केली आहे.
या कारवाईत धुळे नगररचना विभागातील सहाय्यक रचनाकार कल्पेश धनलाल मोरे (वय २८, वर्ग–२), सहाय्यक आरेखक किशोर भटा भोई (वय ४३, वर्ग–३) तसेच धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक दीपक आनंद हटकर (वय ४०) यांना अटक करण्यात आली आहे.
तक्रारदारांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीतील १० हजार चौरस मीटर क्षेत्र औद्योगिक प्रयोजनासाठी बिनशेती करण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सादर करण्यात आला होता. सदर प्रकरण लेआऊट मंजुरीसाठी नगररचना विभागाकडे पाठवण्यात आले.
लेआऊट मंजुरीसाठी सहाय्यक आरेखक किशोर भोई याने स्वतःसह वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी एकूण ५० हजार रुपयांची लाच मागितली, त्यापैकी १० हजार रुपये ऑनलाईन स्वीकारून उर्वरित ४० हजार रुपये काम पूर्ण झाल्यावर देण्याची मागणी केली होती. याच प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक दीपक हटकर यानेही बिनशेती आदेश देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितली.
या प्रकरणी तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार दाखल केली. १३ रोजी झालेल्या पडताळणीत लाच मागणी सिद्ध झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला. सापळ्यादरम्यान ३० हजार रुपये स्वीकारताना तिघांनाही रंगेहाथ पकडण्यात आले.
या कारवाईमुळे नगररचना विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयातील लाचखोरांची साखळी उघडकीस आली असून, सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सध्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एसीबीकडून पुढील तपास सुरू आहे.
#dhulecrime #dhulenews #dhule #DhuleCity #DhulePolice


