धुळ्यात वोल्वो बसचा वापर करून गुटखा तस्करी; 8.18 लाखांचा पानमसाला आणि 1.5 कोटींची बस जप्त
धुळे | प्रतिनिधी
धुळे तालुका पोलीसांनी मोठी कारवाई करत पॉश वोल्वो लक्झरी बसच्या आड सुरू असलेली गुटखा तस्करी उघडकीस आणली आहे. या कारवाईत सुमारे ८,१८,०८५ रुपये किंमतीचा प्रतिबंधित सुगंधित पानमसाला तसेच १ कोटी ५० लाख रुपये किंमतीची वोल्वो लक्झरी बस जप्त करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी विश्वसनीय गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, इंदौर येथून श्यामोली परिवहन कंपनीची वोल्वो लक्झरी बस (क्रमांक MP-41-ZJ-7444) पुण्याकडे प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करीत आहे. या माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांना माहिती देण्यात आली.
त्यांच्या मार्गदर्शनानुसार मुंबई–आग्रा महामार्ग क्रमांक ०३ वर आर्वी पोलीस दुरक्षेत्रासमोर नाकाबंदी करण्यात आली. दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास सदर वोल्वो बस थांबवून पंचासमक्ष तपासणी केली असता, प्रवाशांच्या बॅगच्या शेजारी पांढऱ्या गोण्यांमध्ये राजश्री, रजनीगंधा, RMD पानमसाला व सुगंधित तंबाखू असा प्रतिबंधित साठा आढळून आला.
या प्रकरणी
- श्यामोली परिवहन कंपनीचा मॅनेजर अरूप सरकार (रा. इंदौर),
- शर्मा ट्रॅव्हल्सचा मालक कमल शर्मा (रा. इंदौर),
- पुणे येथील प्रविण नावाचा व्यक्ती,
- वोल्वो बस चालक सचिन दिनेश बाडोले (वय ३१, रा. देवास),
- बिरजूदास रतनदास बैरागी (वय ४८, रा. इंदौर)
- बस कंडक्टर प्रदीपकुमार लक्ष्मीनारायण सूर्यवंशी (रा. इंदौर)
यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापैकी चालक, कंडक्टर व बिरजूदास बैरागी यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास मपोउनि छाया पाटील करीत आहेत.
गुटखा तस्करांनी आता लक्झरी वोल्वो बसचा वापर सुरू केल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले असून, अशा तस्करीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे.
या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली
मपोउनि छाया पाटील, पोहवा गणेश काळे, कुणाल पानपाटील, चेतन कंखरे, सुमित ठाकूर, पोकों विशाल पाटील, सुरेंद्र खांडेकर, निलेश पाटील, प्रमोद पाटील व योगेश पाटील यांनी विशेष सहभाग घेतला.


