धुळेकर दुबईत सुखरूप: इराण–अमेरिका–इस्रायल तणावामुळे परतीची उड्डाणे रद्द
धुळे | प्रतिनिधी: नागिंद मोरे
इराण–अमेरिका–इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्रात निर्बंध लागू करण्यात आल्याने अनेक उड्डाणांचे वेळापत्रक बदलले असून काही सेवा तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. या परिस्थितीचा परिणाम धुळ्यातील काही तरुणांच्या परतीच्या प्रवासावर झाला असून दुबईहून भारतात येणारे त्यांचे विमान रद्द झाले आहे.
सुरुवातीला कुटुंबीयांमध्ये चिंता निर्माण झाली होती; मात्र सर्व तरुण पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. धुळेकर मोंटी पाटील यांनी दुबईतील परिसरातून तसेच येथून थेट व्हिडिओ संदेश पाठवत सर्वजण सुखरूप असल्याचे सांगितले. सध्या दुबईतील परिस्थिती शांत असून कोणतीही भीती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विमानसेवा पुन्हा सुरळीत झाल्यानंतर पुढील प्रवासाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, सहल आयोजक कंपनीकडून आवश्यक मार्गदर्शन केले जात असून कुटुंबीयांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(अपडेटसाठी आमच्या वेबसाइटला भेट देत राहा.)


