Dhule News: साक्रीत दुर्दैवी घटना! बहिणीच्या लग्नाच्या तयारीत असताना 17 वर्षीय भावाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बोरगाव येथे बहिणीच्या लग्नाच्या तयारीदरम्यान एक दुर्दैवी घटना घडली असून, विजेचा धक्का लागून 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोशन ठाकरे (वय 17) हा आपल्या चुलत बहिणीच्या लग्नाच्या मंडपासाठी उंबराच्या झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी झाडावर चढला होता. मात्र झाडाच्या वरून गेलेल्या इलेक्ट्रिक मेन लाईनच्या तारा त्याच्या नजरेस पडल्या नाहीत. फांदी तोडताना त्याचा विजेच्या तारेला स्पर्श झाला आणि त्याला जोरदार शॉक लागला. या धक्क्यामुळे रोशन झाडावरून खाली कोसळला.
घटनेनंतर नातेवाईकांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे बोरगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
रोशन हा दोन भावांपैकी लहान होता आणि त्याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. त्याचे आई-वडील व मोठा भाऊ शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ज्या घरात लग्नाच्या तयारीमुळे आनंदाचे वातावरण होते, त्या घरावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, मयत तरुणाचा मृतदेह पिंपळनेर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला असून या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.


