Dhule News: धुळे LCB ची मोठी कारवाई: दोन मोटारसायकल चोर अटकेत; चोरीच्या 8 मोटारसायकली जप्त
धुळे जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत दोन चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या एकूण 8 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींची एकूण किंमत सुमारे 3 लाख 10 हजार रुपये इतकी आहे.
धुळे जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या घटनांचा तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार आझादनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता.
दरम्यान, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पारोळा रोडवरील नक्षत्र लॉन्सच्या मागील रस्त्यावरून दोन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी धुळे, मालेगाव तसेच आसपासच्या परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
- शाहीद अख्तर मोहम्मद सफर अन्सारी (वय 26, रा. सुल्तानिया चौक, जे.बी. रोड, धुळे)
- शेख मोब्बीन शेख रहीम (वय 26, रा. सलीम मुन्शी नगर, मालेगाव, जि. नाशिक)
या दोघांकडून लपवून ठेवलेल्या एकूण 8 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोउनि. अमित माळी तसेच पोलीस कर्मचारी हेमंत बोरसे, मच्छिद्र पाटील, संतोष हिरे, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, आशिष वानखेडे, दिनेश परदेशी व प्रकाश सोनार यांच्या पथकाने केली.


