धुळ्यात फरार खून आरोपी 24 तासांत जेरबंद; निष्काळजीपणामुळे दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
धुळे शहरातील मोहाडी येथील 2020 मधील राहुल मिंड खून प्रकरणातील बंदीवान आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पसार झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत त्याला पुन्हा जेरबंद करण्यात आले आहे. मात्र या घटनेत निष्काळजीपणा केल्याप्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश अर्जुन सोनवणे हा आरोपी धुळे कारागृहात शिक्षा भोगत असून न्यायालयीन कोठडीत होता. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारासाठी हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी दुपारच्या सुमारास त्याने पोलिसांच्या निगराणीवर तुरी देत तेथून पळ काढला.
आरोपी फरार झाल्याची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली आणि त्याचा शोध सुरू करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) पथकाने तत्परतेने तपास करत अवघ्या 24 तासांच्या आत आरोपीला शोधून पुन्हा अटक केली.
दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. आरोपीच्या फरारीस कारणीभूत ठरलेल्या निष्काळजीपणाबद्दल दोन पोलिस अंमलदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
या घटनेमुळे पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.


