Dhule News: विहिरीत पडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू, आर्वी गावावर शोककळा
धुळे | प्रतिनिधी
धुळे तालुक्यातील आर्वी गावात शेतात काम करत असताना विहिरीत पडून पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
भाऊसाहेब निंबा माळी (वय ४३) आणि योगेश भाऊसाहेब माळी (वय १७) अशी मृतांची नावे आहेत. दिनांक १५ मे रोजी दुपारी जेवणाचा डबा घेऊन गेलेल्या भाऊसाहेब यांच्या पत्नीला दोघेही शेतात दिसून न आल्याने त्यांनी शोध सुरू केला. बराच वेळ शोध घेतल्यानंतर विहिरीत दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी विहिरीजवळ गर्दी केली. स्थानिकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढून भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दोघांना मृत घोषित केले.
या घटनेने आर्वी गावात शोककळा पसरली असून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.


