Dhule News; नीट पेपरफुटी प्रकरणावरून धुळ्यात युवासेना आक्रमक; दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे
देशभर गाजत असलेल्या नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणावरून धुळे शहरात ठाकरे गटाच्या युवासेनेने आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन देत सदर प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून दोषींना कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी केली. पेपरफुटीसारख्या गंभीर प्रकारामुळे लाखो विद्यार्थ्यांचे मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान झाले असून दोषींना कोणतीही दया न दाखवता कठोर शिक्षा द्यावी, अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
यावेळी आंदोलकांनी “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही”, “पेपर माफियांवर कठोर कारवाई करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तसेच या संपूर्ण रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या सर्व आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही युवासेनेकडून करण्यात आली.
विद्यार्थी आणि पालकांमध्ये निर्माण झालेला संताप लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने आणि पारदर्शक कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.


