Dhule News; गुलमोहर रोकड प्रकरणाला वर्ष पूर्ण; शिवसेना ठाकरे पक्षाकडून प्रतीकात्मक वर्षश्राद्ध आंदोलन
धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे
मागील वर्षी धुळे शहरातील शासकीय गुलमोहर विश्रामगृहात तब्बल 1 कोटी 84 लाख रुपयांची रोकड सापडल्याच्या गाजलेल्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपींवर अद्याप ठोस कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने आज अनोखे आंदोलन करण्यात आले.
राज्याची अंदाज समिती धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना गुलमोहर विश्रामगृहात मोठी रोकड सापडल्याची घटना घडली होती. माजी आमदार अनिल गोटे यांनी हे प्रकरण उघडकीस आणले होते. या प्रकरणात अंदाज समितीतील आमदार तसेच मंत्रालयातील स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्यावर अद्याप ठोस कारवाई न झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याने शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुलमोहर शासकीय विश्रामगृह येथे प्रतीकात्मक वर्षश्राद्ध घालत निषेध व्यक्त केला. यावेळी हिंदू धर्माच्या रितीरिवाजानुसार विधीवत पूजा करण्यात आली तसेच काही कार्यकर्त्यांनी मुंडन करून आंदोलनात सहभाग नोंदविला.
दरम्यान, आंदोलनस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणारे बॅनर लावण्यात आले होते. “मुख्यमंत्री या प्रकरणात SIT स्थापन करणार होते, त्याचे पुढे काय झाले?” असा सवालही आंदोलकांनी उपस्थित केला.


