Dhule Crime; लग्न लावून देत नसल्याच्या रागातून मुलानेच आईला जिवंत जाळले; धुळे जिल्ह्यात खळबळ
धुळे | प्रतिनिधी
धुळे तालुक्यातील महिंदळे गावात आई-मुलाच्या नात्यालाच काळिमा फासणारी हृदयद्रावक घटना घडली आहे. लग्न लावून देत नसल्याच्या रागातून एका रिक्षाचालकाने स्वतःच्या वृद्ध आईच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री उघडकीस आली. गंभीर भाजल्याने उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.
जिजाबाई भटू खैरनार-पाटील (वय ६५) असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलिसांनी संशयित प्रदीप उर्फ दगडू भटू खैरनार-पाटील (वय ४५) याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप खैरनार याच्या मनात आई आपले लग्न लावून देत नसल्याची भावना होती. याच कारणातून त्याच्या मनात आईविषयी संताप निर्माण झाला होता. काल मध्यरात्री तो मद्यधुंद अवस्थेत घरी आल्यानंतर त्याने आईशी वाद घातला. “माझा विवाह का लावून देत नाही?” असा जाब विचारत दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
वाद विकोपाला गेल्यानंतर प्रदीपने आईच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला पेटवून दिल्याचा आरोप आहे. या घटनेत जिजाबाई खैरनार गंभीर भाजल्या गेल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास धुळे तालुका पोलीस करीत आहेत.
या घटनेमुळे महिंदळे गावासह परिसरात संताप आणि शोककळा पसरली आहे. वृद्ध आईवर स्वतःच्या मुलाकडूनच असा अमानुष प्रकार घडल्याने ग्रामस्थांनी तीव्र हळहळ व्यक्त केली आहे. कौटुंबिक वाद, मानसिक तणाव आणि मद्याच्या व्यसनातून वाढणाऱ्या हिंसक घटनांबाबत पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे.


