धुळ्यात भीषण अपघात! भरधाव कंटेनरच्या धडकेत पिता-पुत्राचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर
धुळे | प्रतिनिधी: नागिंद मोरे
धुळे शहरातील सुरत बायपास रिंगरोडच्या सुरुवातीला, सिव्हिल हॉस्पिटलजवळील हॉटेल आदर्शसमोर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने एकाच कुटुंबातील पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुरमेपाडा येथील रहिवासी जितेश ऊर्फ मयुर नंदलाल कुलकर्णी (वय 36), पत्नी मोनाली मयुर कुलकर्णी (वय 30) आणि मुलगा खुशाल मयुर कुलकर्णी (वय 5) हे दुचाकीने धुळ्याकडे येत होते. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात जितेश कुलकर्णी आणि त्यांचा पाच वर्षीय मुलगा खुशाल यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मोनाली कुलकर्णी या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातानंतर कंटेनर चालकाविरुद्ध मोहाडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या हृदयद्रावक अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून भरधाव वाहनांवर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


